राज्यात बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस

हवामान विभागाचा अंदाज

पुणे : सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागावर तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात गेल्या २४ तासांत बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारपर्यंत (२७ सप्टेंबर) संपूर्ण राज्याला यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

मात्र, पावसाचा जोर विदर्भात जास्त राहणार असून उर्वरित राज्यात जोर कमी राहणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंगालच्या उपसागरात विविध ठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत. तसेच उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने हिमालयाच्या पायथ्यापासून ते पंजाब, हरियाणा, दिल्लीपासून मध्यप्रदेशपर्यंत मोठा पाऊस झाला. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र असा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेल्या २४ तासांत राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. या पट्टयाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे २७ सप्टेंबरपर्यंत फक्त विदर्भात जोर राहील, तर उर्वरित राज्यात पावसाचा कमी जोर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

दरम्यान, गेल्या २४ तासांत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, कोल्हापूर, बीड, नंदूरबार, सातारा, जळगाव, धुळे, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, रायगड, नगर, नाशिक, सांगली, नांदेड, नागपूर असा सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्याचा पाऊस हा मोसमी पाऊसच असून बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम आहे. परतीचा पाऊस राजस्थानातून सोमवारपासून सुरु होत आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रातून जाण्यास ५ ते १० ऑक्टोबरचा कालावधी उजाडणार आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली.

News Category: 
Maharashtra

Sharing