लेकीसाठी जिल्हयाच्या एकीची वज्रमूठ ; बीडच्या वेशीवर पंकजाताई मुंडेंचं 'न भूतो न भविष्यती' स्वागत*

*मी मतांचं नाही विकासाचं राजकारण करते ; जिल्हयाच्या विकासाचं बीजारोपण करण्यासाठी साथ द्या - पंकजाताई मुंडे यांची जनतेला साद*

आष्टी (प्रतिनिधी):- 
राजकारण करत असताना मी कधी कुणाविषयी अभद्र बोलले नाही की कधी जातीभेद केला नाही. मायनस असणाऱ्या गावांनाही करोडो रूपयांचा निधी दिला. मी मतांचं नाही तर विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आहे, जिल्हयाच्या विकासाचं बीजारोपण करण्यासाठी मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे, त्यासाठी मला साथ द्या अशा शब्दांत भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार तथा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जनतेला साद घातली.

   नगरहून प्रस्थान केल्यानंतर बीडच्या वेशीवर धामणगांव इथं पंकजाताई मुंडे यांचं दुपारी थाटात आगमन झालं. लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी मोठया जल्लोषात, मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जेसीबीतून पुष्पवृष्टी करत त्यांचं जोरदार स्वागत केले. खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे हया देखील त्यांच्यासमवेत होत्या. सत्कारानंतर  जनतेशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. 

   भाषणाच्या सुरवातीलाच पंकजाताई म्हणाल्या,उमेदवार बरा आहे का? फॉर्म भरू का? निवडून देणार का? असे प्रश्न समोर उपस्थित असलेल्या नागरिकांना विचारला. मी अशी उमेदवार आहे, ज्याने बायोडेटा बनवला नाही. आमचा विजय निश्चित आहे.  
माझं तिकिट राज्याने नाही ठरवलं, देशातील सर्वोच्य नेत्याने ठरवलं आहे. ही जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली असल्याचे त्या म्हणाल्या.

  पंकजा, तुला परळी विधानसभा लढायची आहे, असं मुंडे साहेब म्हणाले, त्यांची आज्ञा कधीच खाली पडून दिली नाही. मुंडे साहेबांच्या अकाली निधनानंतर मी राज्यात नसते तर खूप गडबड झाली असती, म्हणूनच मी राज्यात थांबले आणि प्रीतमला केंद्रात पाठवलं. मी पराक्रमी आहे, प्रीतम परिक्रमा करणारी आहे,’ असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

*जातीचा विषय का काढला जातो*
------
तिकीट जाहीर झाल्यावर मनात काहुर माजलं. मी बुद्धीने निर्णय घेणार आहे. आमदार-खासदार करणारी नेतेमंडळी सोबत आहेत. २०१९ मध्ये पडल्यावर काही जण पंकजा मुंडे संपली असं म्हणत होते, पण मी संपणार नाही. पंकजा मुंडेंच्या सभेने अनेक जण खासदार होतात, पण निवडणूक आली की मला वाटतं माझ्या जातीचा विषय काढला जातो? माझ्या कामाचा, नितीचा का काढला जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

*मी सर्व जाती धर्माची माऊली*
------
मी कधीच जातीपातीचा विचार करत नाही. मी सगळ्या जाती धर्माची माऊली आहे, कुठल्या नेत्याची सावली नाही. मराठा समाजाची आरक्षणाची भूमिका योग्यच आहे, पण कदाचित माझ्या माध्यमातून हा विषय पूर्ण होणार असेल, मराठा आरक्षणाचा आक्रोश योग्यच आहे. मी कधीच जातीपातीच्या मंचावर गेले नाही. या सगळ्यांची एकत्र मोट बांधण्याची गरज आहे, ती बीडमधून बांधायची आहे. सगळ्या रंगांना एक करायचं आहे. पोटातून काम करण्याची गरज आहे असं त्या म्हणाल्या. कोणाला तरी या समाजात सौख्य राहून द्यायचं नाही. पण त्यांचा डाव आपल्याला यशस्वी होऊ द्यायचा नाही.  मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मी सन्मान करते’, असंही त्यांनी सांगितलं.

‘विनायक मेटेंची शिव संग्राम आजही आमच्यासोबत आहे, मला लोकसभेची चिंता करण्याची गरज नाही. राज्यातील अनेक नेते बीड जिल्ह्यात राजकारण करतात, पण जनता तसं करू देणार नाही. मी मतांचं राजकारण करण्यासाठी नाही तर विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आहे, त्यासाठी मला आपले आशीर्वाद आणि साथ हवी आहे असंही पंकजाताई म्हणाल्या.

*आजचं स्वागत, विजयाची नांदी*
------
आज झालेलं अभूतपूर्व स्वागत ही  पंकजाताईंच्या विजयाची नांदी आहे. मत देण्यात आष्टी मतदारसंघाचा नेहमीच मोठा वाटा असतो. ताईंनी जिल्हयाला न मागता झोळी फाटेपर्यंत निधी दिला आता ताईना भरभरून देण्याची वेळ आपली आहे, त्यांच्या स्टेटसला शोभेल असा विजय मिळवून देण्यासाठी जीव तोडून कामाला लागा असं आवाहन खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी यावेळी केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले. यावेळी आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, भीमराव धोंडे, रमेश आडसकर, आर टी देशमुख, केशवदादा आंधळे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, विजय गोल्हार, वाल्मिक निकाळजे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
••

News Category: 
Beed

Sharing