*धनंजय मुंडेंची भगवानगडावरील संत ज्ञानेश्वर मंदिरास मोठी मदत, सर्व दगड धनंजयने दिले - महंत डॉ. नामदेव शास्त्री*

*पद असो वा नसो, गोरगरिबांची सेवा करण्याची शक्ती मिळो, एवढाच आशीर्वाद गडाला मागतो - धनंजय मुंडे*

*श्री क्षेत्र नारायणगड व श्री क्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताहात धनंजय मुंडेंनी घेतले महंत शिवाजी महाराज व महंत डॉ.नामदेव शास्त्री यांचे दर्शन व आशीर्वाद*

शिरूर कासार (दि. 27) - संत भगवानबाबांच्या विचारांचा व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा प्रसार गडावरून व्हावा यादृष्टीने पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल, असे संत ज्ञानेश्वरांचे मंदिर भगवानगड येथे उभारत आहोत. यासाठी गडाच्या भक्त मंडळींनी गावोगाव देणगी गोळा केली आहे. मात्र मंदिरासाठी लागणारा संपूर्ण दगड हा धनंजय मुंडे यांनी दिला आहे, असे गडाचे महंत, न्यायाचार्य डॉ.नामदेव शास्त्री महाराजांनी म्हटले आहे. 

भगवानगडाची परंपरा असलेल्या फिरत्या नारळी सप्ताहाची सांगता महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या काल्याचा किर्तनाने झाली. त्याप्रसंगी महंत बोलत होते. 

वारकरी सांप्रदाय, शिक्षण व समाजसेवा अशी गडाची परंपरा असून, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या व त्याद्वारे होणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या प्रसारामुळे ही परंपरा आणखी 1000 वर्ष पुढे चालणार आहे. खरे तर धार्मिक कार्यात या हाताने केलेली मदत त्या हाताला कळू द्यायची नाही, अशी मला शिकवण आहे. परंतु शास्त्री बाबांनी सांगितल्याप्रमाणे गडावरील मंदिरासाठी मला मुंगीचा वाटा उचलता आला हे माझे भाग्यच आहे, असे मी समजतो. भविष्यात मी कुठल्या पदावर असेल नसेल मात्र, कायम गोरगरिबांची सेवा करण्याची शक्ती मला मिळावी, असा आशीर्वाद मी गडाकडे मागत असल्याचे याप्रसंगी धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

व्यासपीठावर महंत डॉ.नामदेव शास्त्री यांच्यासह ना.धनंजय मुंडे, खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, आ.बाळासाहेब आजबे, मा.आ.अमरसिंह पंडित, आ.मोनिकाताई राजळे, आ.निलेश लंके, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, प्रतापराव ढाकणे यांसह मान्यवर उपस्थित होते. 

तत्पूर्वी श्री क्षेत्र नारायणगडाची परंपरा असलेल्या फिरत्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथे जाऊन नारायण गडाचे महंत, गुरुवर्य ह.भ.प. शिवाजी महाराज यांचेही दर्शन व आशीर्वाद घेतले. यावेळी मा.आ.अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे आदी उपस्थित होते.

News Category: 
Beed

Sharing