1 कोटीची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात गाजलेल्या जिजाऊ मल्टिस्टेट घोटाळ्यात एका व्यक्तीला आरोपी न करण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचा वादग्रस्त पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने तब्बल 1 कोटीची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील 30 लाख रुपये  स्विकारताना एसीबीच्या पथकाने एका खासगी इसमाला अटक केले आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेतील अनेक कर्मचारी अडकत असल्याचे चित्र आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ माजली आहे.
बीड जिल्हा पोलीस दलात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातच आर्थिक गुन्हे शाखा तर पैसे कमविण्याचे कुरण झाल्याची चर्चा यापूर्वी अनेकदा होती. जिल्ह्यात मागच्या काही काळात मल्टीस्टेटचे अनेक घोटाळे समोर आले. त्यात आर्थिक गुन्हे शाखेची भुमिका कायम संशयास्पद राहिली. त्यातच आता ‘जिजाऊ मल्टीस्टेट’च्या प्रकरणात एका व्यक्तीला आरोपी न करण्यासाठी व  तपासात सहकार्य करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांच्या लाचेची मागणी आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने केल्याची तक्रार एसीबीकडे आली होती. एसीबीच्या पथकाने लाचेच्या मागणीची खात्री केल्यानंतर सापळा रचला. या प्रकरणात पहिला टप्पा म्हणून 10 लाख रुपये अगोदरच स्विकारण्यात आले होते. उर्वरित रक्कमेपैकी 30 लाख रुपये एका खासगी व्यक्तीकडे देण्याचा निरोप पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने फिर्यादीला दिला होता. त्यानुसार बीडच्या सुभाष रोडवरील एका कापडदुकानात हे 30 लाख रुपये स्विकारताना एसीबीचे पोलीस उपअधिक्षक शंकर शिंदे व त्यांच्या पथकाने अटक केली.
आर्थिक गुन्हा शाखेचा पोलीस निरीक्षक असलेल्या हरिभाऊ खाडेची कारकिर्द मागच्या काही काळात वादग्रस्त राहिलेली आहे. विशेषत: देवस्थान जमीन प्रकरण आणि मल्टिस्टेटच्या  घोटाळा प्रकरणात  आरोपींनाच सहकार्य होईल अशी भुमिका हरिभाऊ खाडेकडून वठविली गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. ‘जिजाऊ मल्टिस्टेट’ प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे होता मात्र या काळात प्रमुख आरोपीला अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले नाही. जिजाऊ सोबतच इतरही काही मल्टिस्टेटच्या प्रकरणात हरिभाऊ खाडे चक्क मल्टिस्टेट चालकांसोबतच असल्याचे चित्र आहे. गेवराई मधील एका मल्टिस्टेटच्या संदर्भाने दाखल गुन्ह्यात आरोपी शहरात फिरत असतांनाही आर्थिक गुन्हे शाखेने मात्र आरोपी फरार असल्याचे सांगत दोषारोपपत्र दाखल केले होते. असे अ्रनेक कारनामे आता समोर येवू लागले आहेत.
दरम्यान या घटनेनंतर हरिभाऊ खाडेच्या काही ठिकाणच्या मालमत्तांवर देखील छापे मारण्यात आल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

News Category: 
Beed

Sharing