बीड मधून बजरंग सोनवणे 6553 मतांनी विजयी

बीड (प्रतिनिधी): आठराव्या लोकसभेसाठी बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या अत्यंत अतितटीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपला धक्का देत ऐतिहासिक विजय मिळविला आहे. भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा त्यांनी 6553 मतांनी पराभव केला. 2009 पासून भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला यश आले आहे. बजरंग सोनवणे यांना 6 लाख 83 हजार 950 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी पंकजा मुंडे यांना 6 लाख 77 हजार 397 इतकी मते मिळाली. बजरंग सोनवणे यांच्या या ऐतिहासिक विजयानंतर जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण आहे.
बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणुक जाहीर झाल्यापासूनच चुरसीची होती. भाजपने या मतदारसंघात आपला उमेदवार बदलत प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस(शरचंद्र पवार) पक्षाने बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. सोनवणे यांनी मागची निवडणुक प्रितम मुंडे यांच्या विरोधात लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. पाच वर्षानंतर सोनवणे यांनी त्या पराभवाचा वचपा काढला आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी प्रथमच मतदानाच्या टक्क्याने 70 ओलांडली होती. विक्रमी 15 लाख 17 हजार इतके मतदान बीड जिल्ह्यात झाले होते. त्यामुळे मताचा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा याबाबत चर्चा सुरू होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक फेरीमध्ये चुरस असल्याचे जानवत होते. आघाडीचा लोलक कधी पंकजा मुंडे तर कधी बजरंग सोनवणे यांच्या बाजुने झुकत होता. अखेर रात्री उशिरा 32 फेर्‍यांची मतमोजणी संपल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी ईव्हीएमच्या मतमोजणीनंतर 6553 मतांची आघाडी घेतली.

ईव्हीएम वरील मतमोजणी जवळपास संपल्यानंतर पंकजा मुंडे मतमोजणी केंद्रावर आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी बीड आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात फेरमतमोजणी घेण्याची मागणी केली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत निकालाची प्रतिक्षा करावी लागली.

News Category: 
Beed

Sharing